मुंबई: भाजपच्या लोकांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचे म्हणणे ऐकले पाहिजे. मात्र, सध्या भाजपच्या लोकांना आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षाही (RSS) मोठे असल्याचे वाटू लागले आहे, असे वक्तव्य कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी केले. गेल्या 12 वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. त्यामुळे सगळ्या यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहेत. यामुळेच भाजपला आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा (RSS) मोठे असल्याचे वाटू लागले असल्याचे दिपके यांनी म्हटले.भाजपने मोहन भागवत काय सांगतात, ते थोडं तरी ऐकले पाहिजे. मोहन भागवत म्हणाले होते की, जेन झी आंदोलन करत आहेत त्यांना देशद्रोही म्हणू नका. त्यानंतरही पंतप्रधान ‘दिमागी नक्सल’ ही नवी संज्ञा वापरात आणतात. यावरुन एक स्पष्ट दिसतंय की, पंतप्रधान मोदी आणि भाजप हे दोघेही मोहन भागवतांचं म्हणणं ऐकत नाहीत. एकीकडे मोहन भागवत सर्वसमावेशकतेची भाषा करतात, विद्यार्थ्यांचा अपमान करु नका सांगतात. पण पंतप्रधान मोदी ‘दिमागी नक्सल’ म्हणतात, हे चांगलं वाटत नाही. आमचं नाही तर तुमचे मार्गदर्शक असलेल्या मोहन भागवतांचं तरी ऐका, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तरी ऐका. त्यांच्यामुळे तुम्ही सत्तेत आला आहात, हे लक्षात ठेवा, असे अभिजीत दिपके यांनी म्हटले. यावर आता भाजपचे नेते काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
भाजपा नेते स्वतःला आरएसएस पेक्षा मोठे समजतात: अभिजित दिपके


